2019-03-31
सलमान मुजावर
MA. Counseling Psychology
चित्रपट: कॉल मी बाय युअर नेम -Call Me By Your Name*
_________________________
*कलाकार:* आर्मी हॅमर, टीमोथि शॅलमेट, माईकल स्टलबर्ग, अमायरा केजर, इस्टर गॅरेल इ.
*पटकथा/लेखक:* अँद्रे ऍसीमन यांच्या कादंबरीवर आधारित.
जेम्स आयव्हरी :- पटकथा.
*दिग्दर्शक:* ल्युका गॉडग्नीनो
----------------------------------------
*चित्रपटाची कथा:*
१९८३ च्या उन्हाळ्यामधील उत्तर इटलीमध्ये घडणारी ही कथा. सतरा वर्षांचा एलिओ पर्लमन (टीमोथि शॅलमेट) हा किशोर त्याचे आई वडील (माईकल स्टलबर्ग व अमायरा केजर) यांच्यासोबत राहतो आहे. एलिओ चे वडील पुरातत्वशास्त्र या विषयाचे प्रोफेसर व संशोधक असतात. त्यांच्याकडे ग्रॅज्युएशन करणारे विद्यार्थी दरवर्षी उन्हाळ्यात त्यांच्या संशोधनामध्ये मदत करण्यास व डॉक्टरेट संपादन करण्यासाठी येत असतात आणि त्यांचा यावर्षीचा विद्यार्थी असतो चोवीस वर्षीय अमेरिकन विद्यार्थी ऑलिव्हर (आर्मी हॅमर) जो त्यांच्या घरी पुढील सहा आठवडे राहणार असतो. म्हणून एलिओ आपली रूम ऑलिव्हर करिता देऊन टाकतो.
पर्लमन कुटुंबासोबत ऑलिव्हर वेळ घालवत असतो. एलिओ ला देखील ऑलिव्हरचं अस्तिव त्याच्या सभोवताली जाणवत असतं. एलिओ ला वाटत असते की ऑलिव्हर थोडा गर्विष्ठ आहे, आणि आणि तो काय मला पसंत देखील करत नाही..! असा त्याचा पूर्वग्रह ऑलिव्हर विषयी असतो. पण या सर्वामध्ये त्याला स्वतःला ऑलिव्हर आवडू लागला आहे हेच कळत नाही.
एका संध्याकाळी शहरातील एका पार्टीमध्ये एलिओ व त्याची मैत्रिण मिरजिया (इस्टर गॅरेल) हे दोघेजण, ऑलिव्हर ला त्या पार्टीमध्ये कियारा नावाच्या मुलीसोबत डान्स करताना व तिचे चुंबन घेताना पाहतात. पण एलिओ त्याकडे जाणून- बुझुन दुर्लक्ष करतो. थोड्या वेळानंतर एलिओ आणि मिरजिया हे दोघेपण डान्समध्ये सहभागी होतात, त्यानंतर ते दोघे स्विमिंग- साठी तलावात जातात. स्विमिंग झाल्यानंतर किशोरावस्थेमधील निर्माण होणारे शारीरिक आकर्षण आणि कुतुहलामुळे एलिओ आणि मिरजिया दोघेही शारीरिक जवळीक करत लैंगिक सुख प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.
दुसऱ्या दिवशी सकाळी एलिओ रात्री घडलेली घटना किंवा त्याचा अनुभव, नाश्त्याच्या टेबलवर बसल्यानंतर वडिलांच्या आणि ऑलिव्हर च्या समोर व्यक्त करतो. त्याचे वडील देखील यागोष्टीवर सकारात्मक प्रतिसाद देतात. कारण त्यांच्यामधील नाते हे पिता- पुत्रापेक्षा एक मित्राचे जास्त असते.
रात्री एलिओ त्याच्या आई-वडिलांसोबत निवांत वेळ व्यतीत करत असताना, त्याची आई एका राजकुमाराची कथा वाचत असते ज्यामध्ये एक लाईन असते “Is it better to speak or to die ?” हे एलिओ ऐकतो व आपल्या मनातील भावना ऑलिव्हर ला सांगून टाकण्याचे ठरवतो.कारण मधील काही दिवसात ते दोघे चांगले मित्र बनलेले असतात.
एलिओ, ऑलिव्हर सोबत त्याची जी आवडती ठिकाणे आहेत ती फिरायला घेऊन जात असतो. असेच एक दिवस फिरून झाल्यावर निसर्गाच्या सानिध्यात, निळ्या आकाशाखाली, हिरव्यागार गवतावर दोघे निवांत पडलेले असतात, तेव्हा एकमेकांवर असलेल्या प्रेमभावनेच्या भरात दोघे एकमेकांचे चुंबन घेतात. एलिओ पुढील पायरी ओलांडण्याच्या आधीच ऑलिव्हर त्याला थांववतो व हे ठीक नाही किंवा चुकीचं आहे असे त्यास समजावुन सांगतो, व ते दोघे तेथून निघून जातात.
त्या दिवसानंतर एलिओ आणि ऑलिव्हर एकमेकांना दुर्लक्षित करू लागतात. एलिओ सुद्धा तिची मैत्रीण मिरजिया सोबत जास्त वेळ घालवू लागतो. पण त्याचे मन मात्र ऑलिव्हर मध्येच अडकून असते.
एके दिवशी न राहवून एलिओ एक चिठ्ठी लिहून ऑलिव्हर च्या रूममध्ये दारामधून सरकवतो. ज्यामध्ये त्याने “मला तुझ्याशी बोलायचे आहे” असे लिहिलेले असते. ऑलिव्हर ती चिठ्ठी वाचतो व त्यास प्रतिउत्तर म्हणून एक चिठ्ठी त्याला पाठवते की, “आज मध्यरात्री आपण भेटूया”. त्यानंतरचा पूर्ण दिवस एलिओ आपल्या मैत्रिणीसोबत व्यतीत करतो. आणि मध्यरात्री ऑलिव्हर ला त्याच्या रूममध्ये भेटण्यासाठी जातो. भेटल्यानंतर ते दोघे एकमेकांच्या मिठीत समावतात, आपल्या प्रेमभावना व्यक्त करतात व शारीरिक सुखाचा आनंद उपभोगतात. ऑलिव्हर त्याला म्हणतो “Call me by your name, and I call you by mine”. या अनुभवानंतर ऑलिव्हर देखील खुश असतो, तसेच तो एलिओ ला सांगतो की तू जे काही घडलं त्या गोष्टीचा कधी पश्चाताप वगैरे करून घेऊ नकोस.
एलिओ आणि ऑलिव्हर एकमेकांच्या प्रेमात असतात, एकमेकांसोबत वेळ घालवत असतात, आपल्या भावना व्यक्त करत असतात. एलिओ ला वाटत असते की ऑलिव्हर ने आपल्याला कधीच सोडून जाऊ नये.
असेच एक दिवशी एलिओची मैत्रीण मिरजिया त्याला भेटण्यासाठी येते व तू मला आजकाल का दुर्लक्ष करतोयस असे विचारते, पण एलिओ कडे या प्रश्नाला काहीच उत्तर नसते. मिरजिया ला पण कळून जाते की एलिओ तिच्यावर प्रेम करत नाही व ती तेथून निघुन जाते.
ऑलिव्हर च्या कामाचे शेवटचे तीनच दिवस उरलेले असतात व ते काम इटली जवळील बर्गमो या ठिकाणी असते म्हणून ऑलिव्हर पर्लमन कुटूंबियाची रजा घेऊन निघतो. पण या प्रवासात त्याच्या सोबत एलिओ देखील जातो. या शेवटच्या तीन दिवसात एलिओ आणि ऑलिव्हर खूप फिरतात, मजा करतात, डान्स करतात, थोडक्यात एकत्रित प्रेमाचे क्षण घालवतात. शेवटच्या दिवशी ऑलिव्हर ट्रेन ने जाणार असतो, स्टेशन वर त्याची ट्रेन पोहोचल्यानंतर एलिओ आणि ऑलिव्हर एकमेकांना शेवटचे आणि दीर्घ असे आलिंगन देतात व ऑलिव्हर ट्रेन मध्ये बसुन निघून जातो. एलिओ विरह दुःखाने त्याठिकाणी बसुन राहतो. तो तिच्या आईला फोन करून त्याला तेथून घेऊन जाण्यासाठी सांगतो. त्याची आई त्याला कारमधुन घरी घेऊन जात असताना एलिओ खूप रडतो. त्याच्या पालकांना एलिओ आणि ऑलिव्हर च्या मैत्रीची जाणीव असते पण त्या मैत्रिपलीकडील प्रेम मात्र माहीत नसते. गाडीतुन शहरामध्ये पोहोचल्यानंतर एलिओला मिरजिया भेटते, ती तिच्या भावना एलिओ समोर बोलून दाखवते व आपण दोघे चांगले मित्र बनुन राहुयात असे बोलुन मैत्रीचा हात पुढे करते, एलिओ देखील मी आयुष्यभर तुझा चांगला मित्र बनुन राहीन असे बोलुन तिच्यासोबत हस्तांदोलन करतो.
घरी गेल्यानंतर एलिओची मानसिक स्थिती समजुन त्याचे वडील त्याला मैत्री व आपल्या मनातील भावना व्यक्त करण्याचे महत्त्व समजावून सांगतात. थोडक्यात त्याला त्याच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठी समुपदेशन करण्याचे कार्य एलिओचे वडील याठिकाणी करतात.
ख्रिस्तमसचा दिवस येतो सगळीकडे पांढऱ्याशुभ्र बर्फाचे आच्छादन असते, घरामध्ये ख्रिस्तमसच्या डिनर ची तयारी सुरू असते. अशातच घरातील फोनची रिंग वाजते, एलिओ फोन उचलतो, दुसरीकडून ऑलिव्हर चा आवाज ऐकू येतो. ऑलिव्हर आणि एलिओ एकमेकांना किती “Miss” करतात हे त्यांच्यामधील संवादामधून दिसून येते. थोड्यावेळाने ऑलिव्हर म्हणतो की त्याची एंगेजमेंट झाली आहे. तेवढ्यात एलिओचे आई-वडील फोन त्याच्याकडून घेतात व त्याला त्याच्या एंगेजमेंट साठी शुभेच्छा वगैरे देतात. नंतर फोनवर फक्त एलिओ आणि ऑलिव्हरचं संभाषण सुरू होतो. शेवटी एलिओ आणि ऑलिव्हर एकमेकांना, एकमेकांच्या नावाने पुकारतात. आणि ऑलिव्हर म्हणतो की मला तुझ्यासोबती मधील सर्व क्षण आठवणीत राहतील.
फोन ठेवल्यानंतर एलिओ घरातील शेकोटीसमोर त्याच्या भिजलेल्या डोळ्याने, आपल्या प्रेमाला आपल्या मनाच्या एका कोपऱ्यामध्ये बंद करून त्याच्या आठवणींमध्ये शांतपणे बसून राहतो व चित्रपट संपुन जातो.
----------------------------------------
*वैशिष्ट्ये/ विश्लेषण:*
चित्रपटाचे कथानक हे समलैंगिक प्रेमकथा असल्यामुळे आपल्याकडे हा चित्रपट बघताना सर्वसामान्य दर्शकाला हा विषय रुचेल की नाही सांगणे थोडे कठीणच आहे. कारण या घटकाला जरी शासनाने मान्यता दिली असली तरी अजून समाजाने पुर्णपणे याला स्वीकारलेलं नाहीच आहे. आजूनसुद्धा समाजात याविषयी पूर्वग्रहदूषित मन:स्थिती आपण पाहु शकतो. म्हणुन या घटकसंबंधी जनजागृती आज मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. आणि ते करण खूपच आवश्यक आहे. त्यासाठीच या विषयांवरील चांगले चित्रपट आज परदेशात आणि आपल्या भारतात देखील निर्माण होताना आपण पाहु शकतोय.
पहिल्या प्रेमाची व्याख्या ही ज्याच्या- त्याच्या पहिल्या अनुभवावरून वेगवेगळी असेल. किशोरवयात होणारे शारीरिक, मानसिक, आणि सामाजिक बदल हे प्रत्येक किशोरवयीन मुला-मुलींच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा किंवा भावनांचा प्रवास मांडण्याचा उत्तम प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. कलाकाराच्या व्यक्तिरेखेमधून आपण पाहु शकतो की शारीरिक आकर्षण, प्रेम, मैत्री, आणि स्वतःची लैंगिकता इ. विषयी मनात असणारा संभ्रम यामध्ये दाखवण्यात आला आहे. आपल्याला काय आवडतं आणि काय नाही? याबद्दल असणारा प्रश्नचिन्ह एलिओ ची भूमिका करणाऱ्या कलाकाराने उत्तमरीत्या साकारली आहे. त्याच बरोबर एक वेगळाच सामाजिक वातावरण व नातेसंबंध या चित्रपटामधून पाहायला मिळतो. उदा. जेव्हा एलिओ नाश्त्याच्या टेबलवर वाडीलांसमोर त्याच्या आणि मिरजिया मध्ये जे काही घडलं ते सहजपणे व्यक्त करतो आणि त्याचे वडीलसुद्धा ते सहजपणे स्वीकारतात तेव्हा त्यांच्यामधील मुक्त नातेसंबंध आपल्याला जाणवते. तसेच समाज काय म्हणेल, म्हणून आपल्या मनातील भावना दाबुन ठेवायच्या त्याचे दमन करायचे, मी स्वतः कोण आहे, काय आहे, मला काय पाहिजे हे सर्व विसरून समाजामध्ये, समाज जसा म्हणेल त्या पद्धतीने वावरायचे इ. घटक दिग्दर्शकाने खूपच समर्पकपणे दर्शवले आहे. किशोरवयात स्वतः च्या लैंगिकते बद्दल अनेक शंका मुलांच्यात निर्माण होत असतात. लैंगिक बदल, जनानांगविषयीचे कुतूहल, सेक्स, शारीरिक आकर्षण, शारीरिक बदल, मला मुलगी आवडते का मुलगा? इ गोष्टी बद्दल अनेक प्रश्न मुलांच्या मनात असतात व त्याची उत्तरे शोधण्यासाठी ते कदाचित गैरमार्गाचा अवलंब करू शकतात, आणि त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तीमत्वावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक पद्धतीने होऊ शकतो. आपल्याकडे शाळेमध्ये लैंगिक शिक्षणाची सुरुवात झाली असली तरी त्याचे प्रमाण कमी आहे व काही शाळांमध्ये याविषयी उदासीनता दिसून येते म्हणून हे चित्र बदलणे खूपच आवश्यक आहे आणि या विषयीची जनजागृती करणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
चित्रपटामधील प्रत्येक कलाकाराने आपापल्या भूमिका खूपच उत्तमरीत्या आणि सुंदर पध्दतीने साकारल्या आहेत. एलिओचे पात्र साकारताना किशोवयातील वेगवेगळ्या छटा उदा. अल्हड, अभ्यासु, संभ्रमित, निरागस, कुतूहल इ. प्रकारे आपल्या या अभिनयातून उत्तमरीत्या पडद्यावर रेखाटल्या आहेत. तर ऑलिव्हर ची भूमिका थोडा समजूतदार व इतर गोष्टींचा, समाजाचा विचार करणारा तरुण देखील छान साकारला आहे. या व्यतिरिक्त इतर कलाकारांनी सुद्धा त्यांच्या भूमिकेला पुरेपुर न्याय दिला आहे. असा हा चित्रपट एक सामान्य पण असामान्य प्रेमकथा म्हणुन नक्की पहावा.
----------------------------------------
सलमान मुजावर
MA. Counseling Psychology
Read more